शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील सीबी देसले विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 157 वी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन भबुतराव देसले उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष साहेबराव सरकार, उपाध्यक्ष वाल्मिक पाटील आणि सचिव प्रकाश पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष वाल्मिक पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता, स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठेच्या विचारांची आजच्या पिढीला असलेली गरज अधोरेखित केली. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप दिले, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एसए वाडिले होते. आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, स्वच्छता ही केवळ परिसराची नव्हे, तर विचारांचीही असावी. स्वावलंबनातून आत्मनिर्भर समाजाची निर्मिती व्हावी आणि प्रत्येकाने श्रमाचा सन्मान करावा, हा गांधीजींचा संदेश विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा. विद्यार्थ्यांनीही गांधीजींच्या आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनातील विविध प्रसंग, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, सत्याग्रहाची भूमिका, अहिंसेचा विचार आणि स्वच्छतेचा संदेश याविषयी आपले विचार मांडले. रुचिका माळी, वैष्णवी बोरसे, लावण्या माळी, पंखुडी गिरासे, नौसीन पिंजारी, यादवी पाटील, लतिका वाघ, तनु मोरे, वंशिका पाटील, इशिका पाटील, उन्नती मंगळे, ऋतुराज ठाकूर, पियुष कोळी, तेजपाल गिरासे, चतुरसिंह गिरासे, विजय माळी, दुर्गेश बोरसे, कुणाल कोळी या विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनकार्याविषयी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या मनोगतातून गांधी विचारांचा जागर झाल्याचे चित्र दिसून आले.
समाचार
सी. बी. देसले विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्तिक जयंती उत्साहात साजरी
4 अक्टूबर 2026 को 12:35 am बजे

सी. बी. देसले विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्तिक जयंती उत्साहात साजरी
साझा करेंWhatsApp



