97 गुण मिळवत पटकावला राज्यात प्रथम क्रमांक
येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी पियुष सचिन बारी याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत इंग्रजी विषयात 97 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला स्व. रामचंद्र यशवंत दळवी स्मृती पारितोषिकाने गौरविण्यात आले. भगिनी मंडळ संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात झालेल्या गुणगौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पियुषचा भेटवस्तू व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुण गुजराथी, चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, पोलीस निरीक्षक पवन देसले, उद्योजक आशिष गुजराथी, संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, मुख्याध्यापक सुनील पाटील तसेच पियुषचे पालक उपस्थित होते. प्रा. अरुण गुजराथी यांनी पियुषच्या यशाचे कौतुक करताना, ध्येय स्पष्ट ठेवून सातत्याने मेहनत केल्यास यश निश्चित मिळते, असे सांगितले. पियुषने आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक व मार्गदर्शनाला देत संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चंद्रहास गुजराथी, आशिष गुजराथी व पवन देसले यांनीही पियुषला शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. यावेळी पियुषला सन्मानित करण्यात आले, तसेच त्याचे आजोबा सेवानिवृत्त शिक्षक मधुकर बारी यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी तर आभार अनिल महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पियुषला मार्गदर्शन करणारे इंग्रजी विषयाचे शिक्षक एसआर चव्हाण यांनाही सन्मानित करण्यात आले.




