गाजरे हॉस्पिटल येथे मोफत योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवीन बसस्थानकाजवळील गाजरे हॉस्पिटल येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय मोफत योग शिबिराचा दि. २९ सप्टेंबर रोजी उत्साहात समारोप करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. ज्योती वाघ उपस्थित होत्या. त्यांनी योग व प्राणायामाच्या माध्यमातून निरोगी व आनंदी जीवन जगण्याचा संदेश दिला. धकाधकीच्या जीवनात ऊर्जा टिकवून ठेवणे तसेच तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. के.सी.ई. सोसायटी संचलित मुळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार व डॉ. ज्योती वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एम.ए.च्या विद्यार्थिनी हर्षा पवार यांनी शिबिराच्या प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यास मोठा फायदा होत असल्याचे सांगत, अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा सहभागी महिलांनी व्यक्त केली.




