डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती संस्कृती आणि इतिहासाची साक्षीदार आहे. 21व्या शतकात मराठीला डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्याची गरज आहे. मुंबईतील चर्चगेट येथील पाटकर सभागृहात आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळाले आहे, असेही त्यांनी नमूद केले. फडणवीस यांनी मराठीच्या समृद्ध शब्दसंपदेचा उल्लेख करताना मराठी ज्ञानकोश आणि शब्दकोशांच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. विसाव्या शतकात तयार झालेल्या मराठी ज्ञानकोश आणि शब्दरत्नाकरामध्ये 11 ते 13 लाख शब्द होते. या तुलनेत ऑक्सफर्ड शब्दकोशात सुमारे सहा लाख, तर मँडरिन, स्पॅनिश आणि फ्रेंचसारख्या भाषांमध्ये साधारण तीन ते साडेतीन लाख शब्द आहेत. राज्य शासनाच्या प्रकाशित मराठी शब्दकोशात सध्या सुमारे तीन लाख शब्द असून, पुढील आवृत्त्यांमध्ये ही शब्दसंपदा 13 लाख शब्दांपर्यंत नेण्याचे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषेचा हा शब्दवैभव केवळ अभिमानाचा विषय न राहता, आधुनिक ज्ञाननिर्मितीमध्येही त्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रातील संकल्पना मराठीत उपलब्ध झाल्यास मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा बनेल, असे त्यांनी स्पष्ट केले.




