म्हापसा येथील घरातून आणि रेल्वे प्रवाशांकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) गोवा क्षेत्रात कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. 29 सप्टेंबर रोजी केलेल्या या कारवाईत म्हापसा, बारदेज येथील घरांसह रेल्वेने प्रवास करणाऱ्या संशयितांकडून विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एनसीबी गोवा शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पथकाने थिविम रेल्वे स्थानकावर दोन संशयितांना अडवले. त्यांच्याकडून चरस असल्याच्या संशयावरून 87 ग्राम वजनाचा तपकिरी रंगाचा चिकट पदार्थ जप्त करण्यात आला. या कारवाईचा तपास करत असताना एनसीबीचे पथक कोलवळे येथे पोहोचले. तिथे त्यांनी आणखी एका व्यक्तीकडून चरस असल्याचा संशय असलेला 2.35 ग्राम वजनाचा तपकिरी रंगाचा चिकट पदार्थ जप्त केला. या दोन्ही ठिकाणी केलेल्या जप्ती कारवाईत एकूण तीन जणांना अटक करण्यात यश आले.




